Home ब्रेकिंग न्यूज “गॅस तुटवडा नसल्याचा सरकारी दावा फोल; गडचिरोलीत शेकडो ग्राहकांच्या रांगा, तासन्‌तास प्रतीक्षेनंतर...

“गॅस तुटवडा नसल्याचा सरकारी दावा फोल; गडचिरोलीत शेकडो ग्राहकांच्या रांगा, तासन्‌तास प्रतीक्षेनंतर संताप”

0
788

 

गडचिरोली | प्रतिनिधी :

जिल्ह्यात गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचा सरकार आणि प्रशासनाचा दावा प्रत्यक्षात फोल ठरत असल्याचे चित्र गडचिरोली शहरात पाहायला मिळाले. शहरातील स्थानिक गॅस एजन्सीसमोर शेकडो ग्राहकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगांमुळे प्रशासनाच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मंगळवारी गडचिरोली शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या श्री गॅस एजन्सी येथे पहाटे ३ ते ४ वाजल्यापासूनच नागरिकांनी रांगा लावण्यास सुरुवात केली होती. काही वेळातच ही संख्या शेकड्यांमध्ये पोहोचली. महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य ग्राहकांना सिलेंडर मिळवण्यासाठी तब्बल ७ ते ८ तास ताटकळत उभे राहावे लागले.

दरम्यान, एजन्सीकडून सकाळी सुमारे ११ वाजेच्या सुमारास दुकानातून सिलेंडर देण्यास मनाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार सिलेंडरचे वितरण केवळ घरपोच पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच ४ आणि ५ मार्च रोजी ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांनाच घरपोच सिलेंडर देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली. या घोषणेमुळे तासन्‌तास रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर गडचिरोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद चव्हाण तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त नागरिकांना शांत करत संबंधित प्रशासकीय अधिकारी व गॅस कंपनीशी चर्चा केली.

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रांगेत उभ्या असलेल्या सुमारे १५० ग्राहकांना त्याच ठिकाणी सिलेंडर देण्यात आले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि नागरिकांचा रोष काही प्रमाणात कमी झाला. यावेळी उपस्थित नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले.

स्थानिक नागरिकांच्या मते, अनेक वर्षांपासून गॅस एजन्सीकडून घरपोच सेवा न देता थेट दुकानातूनच सिलेंडर वितरण केले जात आहे. यामागे वितरण खर्च वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत घरपोच वितरणाचा आधार घेत ग्राहकांना अडचणीत टाकले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून घरपोच वितरण सक्तीचे करण्याचे निर्देश दिले असावेत, अशी चर्चा आहे. मात्र या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ग्राहकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना घरपोच सिलेंडर वितरण सक्तीचे करावे आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करावी. योग्य नियोजन आणि तांत्रिक व्यवस्थापन केल्यास अशा प्रकारची टंचाई किंवा गर्दी टाळता येऊ शकते, असेही नागरिकांनी नमूद केले.

एकीकडे “गॅसचा तुटवडा नाही” असा दावा केला जात असताना, दुसरीकडे शेकडो नागरिकांच्या लागलेल्या रांगा प्रशासनाच्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या प्रकारामुळे प्रशासनाची कार्यपद्धती पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here