गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरातील चामोर्शी रोडवरील गोकुळ नगर परिसरात, शिवाजी हायस्कूलसमोरील श्री साई अपार्टमेंट या चार मजली इमारतीत काल दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली. घरातील फ्रिजमध्ये शॉर्टसर्किट होऊन त्यातून कॉम्प्रेसरमधील गॅस लीक झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. सुदैवाने वेळेत प्रसंगावधान दाखविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असली, तरी या घटनेमुळे अपार्टमेंटमधील सदोष व्यवस्थापन चव्हाट्यावर आले आहे.
सदर आग दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २०४ मध्ये लागली. या फ्लॅटमध्ये छत्तीसगड येथील प्रतिभा मोहन खरनीया कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील काही सदस्य आपल्या मूळ गावी गेले असताना, घरात केवळ १७ वर्षांची मुलगी एकटीच उपस्थित होती. दुपारी अचानक फ्रिजमधून धूर व ज्वाळा बाहेर येऊ लागल्याने तिने तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच घरातील फर्निचर, विद्युत उपकरणे आदी 50 हजाराची सामग्री जळून खाक झाली.
धुरामुळे श्वास घेण्यास त्रास; इतर फ्लॅटधारकांमध्ये घबराट..
दुसऱ्या मजल्यावर लागलेल्या आगीचा धूर संपूर्ण इमारतीत पसरला. अपार्टमेंटच्या बाहेरील खिडक्यांना काचांचे बंद कव्हर लावण्यात आल्याने धूर बाहेर जाण्यास मार्ग न मिळाल्यामुळे अनेक रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. काही नागरिकांना मळमळ, चक्कर येणे व गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण पसरले.
फायर ऑडिटचा अभाव, विद्युत फिटिंग बेजबाबदार…
या घटनेनंतर अपार्टमेंटमधील रहिवाशांनी आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना धक्कादायक बाबी उघड केल्या. श्री साई अपार्टमेंटमध्ये आजतागायत कोणतेही फायर ऑडिट करण्यात आलेले नाही, तसेच संपूर्ण इमारतीतील विद्युत फिटिंग तांत्रिक व सुरक्षित पद्धतीने करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप फ्लॅटधारकांनी केला आहे. अनेक ठिकाणी तुटलेल्या व उघड्या वायरी, निकृष्ट साहित्य आणि असुरक्षित जोडणी आजही दिसून येत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
याआधीही उपकरणे जळण्याच्या घटना…
अपार्टमेंटमध्ये यापूर्वीही वारंवार वीजपुरवठ्यातील बिघाडामुळे टीव्ही, फ्रिज, एसी, कुलर, वॉशिंग मशीन यांसारखी महागडी विद्युत उपकरणे जळाल्याच्या घटना घडल्याची माहिती फ्लॅटधारकांनी दिली. याबाबत अनेक वेळा अपार्टमेंटच्या मालकाकडे तक्रारी करूनही, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मालक प्रभावशाली; तक्रारींकडे दुर्लक्षाचा आरोप…
श्री साई अपार्टमेंटचे मालक हे राजकीय व शिक्षण क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे, रहिवाशांच्या अडचणींकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप फ्लॅटधारकांनी केला आहे. त्यामुळेच अपार्टमेंटमधील सुरक्षाव्यवस्था धोकादायक स्थितीत असूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
नगरपालिका व वीज विभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी…
या घटनेनंतर अपार्टमेंटमधील सर्व फ्लॅटधारकांनी गडचिरोली नगरपालिकेने तात्काळ चौकशी करून फायर ऑडिट करावे, तसेच वीज विभागाने संपूर्ण इमारतीतील विद्युत यंत्रणा तांत्रिकदृष्ट्या तपासून दुरुस्त करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडून अनेक निष्पाप जीव धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील इतर अपार्टमेंट्सचीही तपासणी आवश्यक…
या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात उभ्या राहिलेल्या इतर अपार्टमेंट्समध्येही फायर ऑडिट व विद्युत सुरक्षेची तपासणी करण्याची मोहीम नगरपालिका प्रशासनाने राबवावी, जेणेकरून नागरिकांच्या जीवितास असलेला धोका टाळता येईल, अशी मागणी शहरातील जागरूक नागरिकांकडून होत आहे.




