Home सामाजिक गडचिरोलीकरांची तहान भागवण्यासाठी नगराध्यक्षांची गोसीखुर्द धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी…

गडचिरोलीकरांची तहान भागवण्यासाठी नगराध्यक्षांची गोसीखुर्द धरणातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी…

0
501

 

 

गोसेखुर्द धरणातून तातडीने पाणी सोडण्याची ॲड. प्रणोती निंबोरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे जोरदार मागणी…

 

गडचिरोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गडचिरोली शहरात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अनियमित व अत्यल्प पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत नगर परिषद गडचिरोलीच्या नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत शहरातील पाणी समस्येबाबत सविस्तर चर्चा करून महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले.

 

गडचिरोली शहराला प्रामुख्याने वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र यंदाच्या तीव्र उन्हामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने घटली असून जलउपसा केंद्रावर आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी शहरातील अनेक प्रभागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून काही भागांत अनेक दिवस पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.

 

सकाळपासून महिलांची पाण्यासाठी भटकंती, पाण्याच्या टँकरसाठी नागरिकांची गर्दी, तसेच घरगुती वापरासाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. उष्णतेच्या वाढत्या झळांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर यांनी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शहरातील प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती दिली. त्यांनी निवेदनाद्वारे गोसेखुर्द धरणातून तातडीने वैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली. धरणातून नियंत्रित स्वरूपात पाणी सोडल्यास नदीतील पाण्याची पातळी वाढून शहराला नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

नागरिकांना उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणीही त्यांनी यावेळी केली. पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून शहरवासीयांना पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

 

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबोरकर म्हणाल्या, “गडचिरोली शहरातील नागरिक सध्या गंभीर पाणीटंचाईचा सामना करत आहेत. वाढत्या तापमानामुळे परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गोसेखुर्द धरणातून पाणी सोडण्याची कार्यवाही करावी. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगर परिषद सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.”

 

दरम्यान, शहरातील विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि व्यापारी वर्गातूनही प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाणीटंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे. आगामी काही दिवसांत पावसाळा सुरू होईपर्यंत पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने प्रशासनाच्या निर्णयाकडे संपूर्ण गडचिरोलीकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here