Home विशेष मूल–चामोर्शी रेल्वे मार्गासाठी प्रशासनाची मोठी हालचाल; संतोष सुरपाम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश…गडचिरोलीच्या...

मूल–चामोर्शी रेल्वे मार्गासाठी प्रशासनाची मोठी हालचाल; संतोष सुरपाम यांच्या पाठपुराव्याला अखेर यश…गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा!

0
12

 

 

 

गडचिरोली | प्रतिनिधी | दि. २८/०५/ २०२६

 

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी मूल–चामोर्शी रेल्वे लाईन आता प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रियेत दाखल झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री सचिवालयासह जिल्हा प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घेत महत्त्वपूर्ण हालचाली सुरू केल्या आहेत.

 

याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर येथील उपमुख्य अभियंता (बांधकाम) यांना अधिकृत पत्र पाठवून मूल–चामोर्शी रेल्वे मार्ग प्रस्तावावर तातडीने आवश्यक कार्यवाही करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घडामोडीनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

 

मार्कडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील युवक, बेरोजगार, शेतकरी तसेच दुर्गम भागातील नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवत आहे. संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी मूल–चामोर्शी रेल्वे लाईनचा विषय थेट मुख्यमंत्री स्तरावर मांडत जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे आणला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात संतोष सुरपाम यांनी या रेल्वे मार्गाचे आर्थिक, सामाजिक आणि सुरक्षेच्या दृष्टीने असलेले महत्त्व अधोरेखित केले होते. विशेषतः चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्ती, वनसंपत्ती, औद्योगिक क्षमता आणि वाहतूक सुविधांच्या अभावामुळे होत असलेल्या नुकसानाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.

 

त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री सचिवालयाने जिल्हाधिकारी कार्यालयाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने रेल्वे विभागाशी अधिकृत पत्रव्यवहार सुरू केल्याने या मागणीला आता प्रशासनिक बळ मिळाले आहे.

 

मुख्यमंत्री सचिवालयाकडून तातडीचे आदेश…

 

मुख्यमंत्री सचिवालय, गडचिरोली कक्षाकडून दि. २७ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला संदर्भ पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र दि. २८ एप्रिल रोजी प्राप्त झाले. सदर पत्रामध्ये मूल–चामोर्शी रेल्वे लाईन संदर्भातील निवेदनावर तातडीने कार्यवाही करून आवश्यक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

 

या आदेशानंतर उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्रीमती अभिता मोरे यांनी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग, नागपूर यांना अधिकृत पत्र (क्रमांक : कार्या-८/स.म.अ./भूसंपादन/काव/२८/२०२६, दि. ३० एप्रिल २०२६) पाठवले. या पत्रामध्ये रेल्वे मार्गाच्या मागणीवर आवश्यक ती कार्यवाही करून त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय व मुख्यमंत्री सचिवालयास सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे.

 

गडचिरोलीच्या विकासासाठी रेल्वे मार्ग का महत्त्वाचा?

 

गडचिरोली जिल्हा खनिज संपत्ती, जंगलसंपत्ती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही अपुऱ्या दळणवळण सुविधांमुळे विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर राहिला आहे. विशेषतः चामोर्शी, मार्कंडादेव, अहेरी, भामरागड यांसारख्या भागातील नागरिकांना मोठ्या शहरांशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

 

मूल–चामोर्शी रेल्वे लाईन सुरू झाल्यास —

 

– जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल

– खनिज व वनउत्पादन वाहतूक स्वस्त आणि सुलभ होईल

– स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील

– दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल

– नागपूरसह राज्यातील प्रमुख शहरांशी संपर्क अधिक वेगवान होईल

– व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीत वाढ होण्यास मदत मिळेल अशा अनेक अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

 

 

रेल्वे विभागाला पाठविण्यात आलेल्या अधिकृत पत्रामुळे आता मूल–चामोर्शी रेल्वे लाईनचा विषय केवळ मागणीपुरता मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रशासकीय प्रक्रियेत दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

स्थानिक नागरिक, व्यापारी, युवक आणि सामाजिक संघटनांनी केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे स्वागत केले असून, “ही केवळ रेल्वे लाईन नसून गडचिरोलीच्या विकासाचा नवा महामार्ग ठरणार आहे,” अशी भावना व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here