Home भ्रष्टाचार गडचिरोलीत अवैध खनिज माफियांची दहशत — नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न; तक्रारीस...

गडचिरोलीत अवैध खनिज माफियांची दहशत — नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न; तक्रारीस ११ दिवसांचा विलंब, प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह…

0
218

गडचिरोली :
जिल्ह्यात अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असून, आता त्यांनी थेट महसूल अधिकाऱ्यांच्या जीवावर उठण्यापर्यंत मजल मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ५ एप्रिल रोजी साखरा फाटा येथे नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या गंभीर घटनेनंतरही तक्रार दाखल करण्यासाठी तब्बल ११ दिवसांचा विलंब झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

५ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास गडचिरोली तालुक्यातील साखरा फाटा येथे महसूल विभागाच्या पथकाने अवैध गिट्टी वाहतूक करणारा ट्रक (MH 33 T 5382) अडवला. या कारवाईत मंडळाधिकारी ए. ए. गव्हाणे आणि नायब तहसीलदार डी. ए. ठाकरे सहभागी होते.
तपासणीदरम्यान चालक मंगेश तोडासे (रा. येरगाव, ता. मूल) याच्याकडे असलेला परवाना मुदतबाह्य असल्याचे आढळले. तसेच, ४ ब्रास परवानगी असताना ट्रकमध्ये त्यापेक्षा दुप्पट गिट्टी भरलेली असल्याचे उघड झाले.
अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न
कारवाई सुरू असताना चालकाने ट्रक मालक होमेश चिलबुले (रा. गडचिरोली) याला घटनास्थळी बोलावले. घटनास्थळी आल्यानंतर मालकाने अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत वाद घालत कारवाईला विरोध केला.
यानंतर, मालकाच्या चिथावणीवरून चालकाने थेट नायब तहसीलदारांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. या गोंधळात ट्रक मालक दुचाकीवरून पसार झाला.
तक्रारीत ११ दिवसांचा विलंब; वाढता संशय
घटना ५ एप्रिल रोजी घडूनही संबंधित प्रकरणी पोलीस तक्रार १६ एप्रिल रोजी — म्हणजेच तब्बल ११ दिवसांनंतर — दाखल करण्यात आली. या विलंबामुळे प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्या मंडळाधिकारी रुपेश गोरेवार यांनी तक्रार नोंदविल्याची बाबही चर्चेचा विषय ठरली आहे.
दरम्यान, नायब तहसीलदारांना चिरडण्याचा प्रयत्न करणारा चालक अद्याप मोकाट फिरत असल्याची माहिती समोर येत असून, केवळ ट्रक मालकावरच गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते.

अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर प्रश्न; कारण अस्पष्टच…

या प्रकरणात गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे तसेच उपविभागीय अधिकारी तथा आयएएस अधिकारी एम. अरुण यांच्याकडून तक्रार उशिरा का करण्यात आली, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यामुळे प्रशासनातील निर्णयप्रक्रियेवर आणि जबाबदारी निश्चितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक पोलीस प्रभारी विनोद चव्हाण यांनी सांगितले की, संबंधित व्यक्तीविरुद्ध १७ एप्रिल रोजी “सरकारी कामात अडथळा” आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार उशिरा प्राप्त झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
कारवाईवर प्रश्न; कठोर पावले उचलण्याची मागणी
या प्रकरणात केवळ “सरकारी कामात अडथळा” या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नायब तहसीलदारांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याने संबंधित चालकावर ‘जीव घेण्याचा प्रयत्न’ या गंभीर गुन्ह्याखाली कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.
तसेच, ट्रक मालकाकडून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याच्या बाबतीतही सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे जीवन सुरक्षित राहील यासाठी ठोस व प्रामाणिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अवैध खनिज तस्करीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना, अशा घटनांकडे गांभीर्याने पाहून दोषींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
आता प्रशासन या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कधीपर्यंत कठोर कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here