Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत चिमुकल्यांना घेऊन भीक मागण्याचे प्रकार उघड; महिला-बालकल्याण विभागाची कारवाई, तरीही प्रश्न...

गडचिरोलीत चिमुकल्यांना घेऊन भीक मागण्याचे प्रकार उघड; महिला-बालकल्याण विभागाची कारवाई, तरीही प्रश्न कायम…

0
1141

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकासह विविध वर्दळीच्या ठिकाणी लहान चिमुकल्या बालकांना सोबत घेऊन महिलांकडून भीक मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा महिला व बालकल्याण विभागाकडे तोंडी तक्रारी केल्या होत्या.
काल अखेर महिला व बालकल्याण विभागाने या प्रकरणाची दखल घेत शहरात पाहणी केली. सुरुवातीच्या पाहणीत काहीही आढळले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, एका सामाजिक कार्यकर्त्याने स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष परिस्थिती दाखवून दिल्यानंतर विभागाचे अधिकारी पुन्हा शहरात दाखल झाले.
या कारवाईदरम्यान महिला पोलिसांच्या मदतीने इंदिरा गांधी चौक परिसरातून तीन महिलांना त्यांच्या लहान बालकांसह ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी संबंधित महिलांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना अशा प्रकारे फिरण्याऐवजी बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. पुढे त्यांना नाश्ता व चहाची व्यवस्था करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मात्र, या कारवाईनंतरही शहरातील इतर भागांत असेच प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले. विशेषतः धानोरा रोडवरील रिलायन्स मॉलसमोर रात्री उशिरा एका सुमारे नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला लहान बाळासह भीक मागताना पाहून नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेची माहिती तत्काळ महिला व बालकल्याण विभागाला देण्यात आली असून, आज पुन्हा व्यापक कारवाई केली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
यापूर्वीही अशा घटनांबाबत राज्य महिला आयोगाच्या भेटीदरम्यान हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी अशा प्रकारांना आळा घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे प्रकार सुरू असल्याने महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, या कारवाईत गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांनी तत्काळ वाहन व महिला कर्मचारी उपलब्ध करून देत महत्त्वाची मदत केली. त्यांच्या सहकार्याबद्दल स्थानिक स्तरावर कौतुक करण्यात येत आहे.
गडचिरोली नगरपालिकेतील नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांनीही या प्रश्नाची दखल घेतली असून, महिला व बालकल्याण सभापती सीमा कन्नमवार आणि उपसभापती शिल्पा हेमके यांनी पुढाकार घेत अशा महिलां व बालकांच्या पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.
एकीकडे प्रशासनाची कारवाई सुरू असली तरी शहरात अजूनही अनेक ठिकाणी चिमुकल्यांना घेऊन भीक मागण्याचे प्रकार सुरूच असल्याने आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज अधोरेखित होत आहे.

जनतेला आवाहन…

अशाप्रकारे गडचिरोली शहरांमध्ये भीक मागण्याचे प्रकार पुन्हा कोणाच्या लक्षात आले तर त्यांनी ताबडतोब पोलिसांना किंवा महिला व बाल कल्याण कार्यालयातील लोकांशी संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here