Home आरोग्य गडचिरोलीत आरोग्य चळवळीला नवे बळ; ‘आरोग्य दूत’ म्हणून पारंपरिक वैद्य-पुजाऱ्यांचा पुढाकार…

गडचिरोलीत आरोग्य चळवळीला नवे बळ; ‘आरोग्य दूत’ म्हणून पारंपरिक वैद्य-पुजाऱ्यांचा पुढाकार…

0
69

 

गडचिरोली : जागतिक आरोग्य दिन निमित्त गडचिरोली जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक आरोग्य जनजागृती करण्यात आली. “एकत्रित प्रयत्न आरोग्यासाठी, विज्ञानाची साथ भविष्यासाठी” या ब्रीदवाक्याखाली सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय तज्ञ तसेच दुर्गम भागातील पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गम गावांमधून आलेल्या पारंपरिक वैद्य व पुजाऱ्यांचा सक्रिय सहभाग. जीवन पुंगाटी, रामा कुले, रामजी कुलेटी, डोलू तिम्मा आदींसह तोडसा पेठा परिसरातील प्रतिनिधींनी अंधश्रद्धा व अघोरी उपचारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. “आजारी व्यक्तींना वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करा आणि विज्ञानाधारित उपचारांचा स्वीकार करा,” असा संदेश देत त्यांनी विज्ञाननिष्ठ आरोग्यसेवेची शपथ घेतली. त्यांच्या या पुढाकारामुळे दुर्गम भागात आधुनिक उपचारांबाबत विश्वास वाढण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हा लोकसहभागाचा मंत्र दिला. आरोग्य ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती लोकचळवळ बनणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी आरोग्याबाबत सजग राहून प्रशासनाला सहकार्य केल्यास गडचिरोली जिल्हा आरोग्य निर्देशांकात राज्यात अग्रस्थानी पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी ग्रामीण सामाजिक रचनेचा विचार करून पुजारी व पारंपरिक वैद्य यांना ‘आरोग्य दूत’ म्हणून जोडण्याचा अभिनव उपक्रम मांडला. समाजात त्यांच्या प्रभावामुळे आरोग्यविषयक संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांवर भर देत लसीकरण, स्वच्छता आणि पोषक आहाराचे महत्त्व अधोरेखित केले. “आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे,” असे सांगत त्यांनी पारंपरिक श्रद्धांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोड देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान वैद्य व पुजाऱ्यांना आरोग्यविषयक माहिती पुस्तिका वितरित करण्यात आल्या. उपस्थितांनी आरोग्यासाठी विज्ञानाची कास धरण्याची सामूहिक शपथ घेतली. या उपक्रमामुळे दुर्गम भागात आरोग्य सेवांचा प्रसार अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होणार असून लोकसहभागातून आरोग्य व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

या कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोटूळे, भीषक तज्ञ डॉ. मनीष मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे, तालुका आरोग्य अधिकारी धानोरा डॉ. पंकज हेमके तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश खोरगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राहुल कंकनालवार यांनी केले. विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here