Home ब्रेकिंग न्यूज १५ दिवस झोपेतच पोलीस! ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात विष पाजून खुनाचा प्रयत्न; आरोपींना...

१५ दिवस झोपेतच पोलीस! ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात विष पाजून खुनाचा प्रयत्न; आरोपींना वाचवण्यासाठी गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्याचा प्रयत्न?

0
4240

 

गडचिरोली | प्रतिनिधी

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे ‘हनी ट्रॅप’च्या माध्यमातून एका तरुणाला जाळ्यात ओढून लाखो रुपयांची खंडणी उकळल्यानंतर त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून लापरवाही, विलंब, तसेच आरोपींना वाचवण्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत.

 प्रेमसंबंधातून ब्लॅकमेलिंगचा सापळा रचला…

मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही कारणांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर संबंधित तरुणी व तिच्या दोन साथीदारांनी तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

“तुझे चॅटिंग व्हायरल करू” अशी धमकी देत त्याच्याकडून सुमारे ३ ते ४ लाख रुपये उकळण्यात आले.

 १५ लाखांची मागणी; नकार दिल्यावर जीवघेणा हल्ला…

यानंतर आरोपींनी आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यामुळे १४ मार्च २०२६ रोजी तरुणाला अडवून त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली आणि बळजबरीने कीटकनाशक पाजण्यात आले.

 आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न…

घटनेनंतर आरोपींनी हा प्रकार आत्महत्येसारखा भासवण्यासाठी पीडिताच्या मोबाईलवरून “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवला तसेच विषाच्या बाटलीचा फोटोही पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

गंभीर अवस्थेत तरुणाला प्रथम आरमोरी व नंतर नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर तो शुद्धीवर आला आणि संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

 

वैद्यकीय अहवाल असूनही १५ दिवस दुर्लक्ष…

पीडित कुटुंबीयांच्या आरोपानुसार, नागपूर येथील इमामवाडा पोलिसांनी १५ मार्च २०२६ रोजी वैद्यकीय तपासणी अहवाल आरमोरी पोलिसांकडे पाठवला होता, तरीही जवळपास १५ दिवस आरमोरी पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले.

 ‘झिरो FIR’ नोंदवण्यात टाळाटाळ…

नागपूर येथे तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही ‘झिरो FIR’ नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे कारवाईत मोठा विलंब झाल्याचा आरोप आहे.

 पोलीस अधिकाऱ्यावर आरोपींना मदतीचा आरोप…

सर्वात गंभीर बाब म्हणजे, गुन्हा दाखल होण्यापूर्वीच फिर्यादीने दिलेला घटनाक्रम आरोपींपर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक नरेश सहारे यांनी आरोपींना अप्रत्यक्ष मदत करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

गुन्ह्याचे स्वरूप कमी करण्याचा प्रयत्न?

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांकडून गुन्ह्याचे स्वरूप कमी (गुन्हा बर्किंग) करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

यामुळे आता आरमोरी पोलिसांनी मुद्दाम गुन्हा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला का? याची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

 उशिरा गुन्हा दाखल; आरोपी फरार…

शेवटी ३ एप्रिल २०२६ रोजी आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाल्याचे समोर आले आहे.

“जर पोलिसच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल पीडित कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.

या प्रकरणात केवळ आरोपींवरच नव्हे, तर पोलिसांच्या भूमिकेवरही सखोल चौकशी होणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आरमोरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी मोबाईलवर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here