Home ब्रेकिंग न्यूज प्रेमजाळ्यातून ब्लॅकमेलिंग; लाखोंची खंडणी उकळल्यानंतर तरुणाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न…

प्रेमजाळ्यातून ब्लॅकमेलिंग; लाखोंची खंडणी उकळल्यानंतर तरुणाला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न…

0
1994

गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे प्रेमसंबंधाच्या आडून ‘हनी ट्रॅप’ रचत एका तरुणाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळण्यात आली आणि मागणी पूर्ण न झाल्याने त्याला विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणीसह तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील २६ वर्षीय तरुणाचे २३ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. काही काळानंतर संबंधित तरुणीच्या आयुष्यात दुसऱ्या युवकाची एन्ट्री झाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादाचा फायदा घेत तरुणीच्या दोन साथीदारांनी मध्यस्थीचा बहाणा करत पीडित तरुणाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
“तुझे चॅटिंग आमच्याकडे आहे, ते व्हायरल करून तुझी बदनामी करू,” अशी धमकी देत या त्रिकुटाने पीडित तरुणाकडून आतापर्यंत सुमारे ४ लाख रुपये उकळले. बदनामीच्या भीतीमुळे तरुणाने ही रक्कम देण्यास भाग पडले.
१५ लाखांची अतिरिक्त मागणी; नकार दिल्यावर जीवावर बेतले
आधीच मोठी रक्कम उकळूनही आरोपींचे समाधान झाले नाही. त्यांनी तरुणाकडे आणखी १५ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्यावर दबाव टाकण्यात आला.
बेदम मारहाण करून बळजबरीने पाजले कीटकनाशक
दि. १३ मार्च २०२६ रोजी पीडित तरुण ब्रह्मपुरी मार्गाने जात असताना आरोपींनी त्याला अडवले. त्याच्यावर बेदम मारहाण करून शेतीमध्ये वापरले जाणारे कीटकनाशक बळजबरीने पाजण्यात आले. त्यानंतर तो बेशुद्ध पडताच आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

आत्महत्येचा बनाव रचण्याचा प्रयत्न…

या गंभीर गुन्ह्यातून बचाव करण्यासाठी आरोपींनी ही घटना आत्महत्येसारखी दाखवण्याचा प्रयत्न केला. पीडिताच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना “बाबा मला माफ करा” असा संदेश पाठवण्यात आला. तसेच विषाच्या बाटलीचा फोटो पाठवून प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आला.

विषप्राशनामुळे तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली होती. त्याला तातडीने नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ३ एप्रिल रोजी तो शुद्धीवर आला. त्यानंतर त्याने संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. या खुलाशामुळे पोलीस यंत्रणाही हादरली आहे.

पीडित तरुणाच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी श्रेया हेमके, नितीन जोध आणि राजू अंबानी (सर्व रा. आरमोरी) यांच्याविरुद्ध खंडणी व खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक कैलास गवते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीने इतर कुणालाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढले आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नेमले असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here