Home विशेष नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोंरकर यांच्या उपस्थितीत गडचिरोली नगर परिषदेत शिवजयंती उत्साहात साजरी…

नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोंरकर यांच्या उपस्थितीत गडचिरोली नगर परिषदेत शिवजयंती उत्साहात साजरी…

0
375

 

गडचिरोली | दि. १९ फेब्रुवारी २०२६

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे आणि आदर्श लोककल्याणकारी शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली नगर परिषद येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगर परिषद परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने नटला होता, तर “जय शिवराय”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निबोंरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवरायांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठ राज्यकारभाराचे महत्त्व अधोरेखित केले.

याप्रसंगी नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निबोंरकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी राजे नव्हते, तर ते सुशासन, स्त्री सन्मान आणि लोककल्याणकारी प्रशासनाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी सर्व धर्मांचा सन्मान राखत न्याय आणि समतेवर आधारित स्वराज्य उभारले. आजच्या काळात पारदर्शक, जबाबदार आणि जनतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासन चालविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. गडचिरोली नगर परिषद शिवरायांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”

तसेच त्यांनी युवकांना शिवरायांच्या शौर्य, धैर्य, संघटन कौशल्य आणि राष्ट्रप्रेमातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच शहरातील मूलभूत सुविधा आणि विकासकामांना गती देण्यासाठी नगर परिषद विविध योजना राबवत असल्याची माहितीही त्यांनी दिली.

या कार्यक्रमाला नगरसेवक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेऊन जनतेच्या सेवेसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या शेवटी “जय शिवराय” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले. यावेळी नगर परिषदेतर्फे सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आणि शिवरायांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here