गडचिरोली : शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जखमी झाल्याची घटना आज दुपारी सुमारे सव्वाचार वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या काचांच्या बॅरिकेटचे मोठे नुकसान झाले असून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या वाहनाचा चालक वामेश्वर पांडुरंग गोवर्धन हा पोलिस कर्मचारी असून तो चातगांव येथे कार्यरत असल्याचे माहिती मिळाली आहे.दुचाकीवरील दोन्ही युवक हे आयटीआय सेंटरमध्ये प्रशिक्षणाच्या कामानिमित्त आले होते. ते एमआयडीसी परिसराकडून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील मुख्य रस्त्याने जात असताना जिल्हा परिषदेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओ (क्रमांक MH 33 AC 9444) या चारचाकी वाहनाने अचानक बाजूच्या रस्त्याने येत दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेमुळे दुचाकीवरील दोन्ही युवक नियंत्रण गमावून थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या काचांच्या बॅरिकेटवर जाऊन आदळले. या धडकेत बॅरिकेटचे काच फुटून मोठे नुकसान झाले. अपघात इतका जोरदार होता की, परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुचाकीस्वार सरळ मार्गाने येत होते, मात्र बाजूच्या मार्गाने अचानक भरधाव वेगात आलेल्या स्कॉर्पिओने त्यांना धडक दिल्याने हा अपघात घडला.

अपघातात जखमी झालेल्या दोन्ही युवकांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणासमोरच अशा प्रकारे भरधाव वेगाने वाहने धावत असल्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच वेगावर नियंत्रण राहत नसेल, तर शहरातील इतर भागात भरधाव वाहनांवर कसे नियंत्रण ठेवले जाणार, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या घटनेमुळे शहरातील वाहतूक नियंत्रण आणि वेग मर्यादेच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




