गडचिरोली :
कोनसरी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचा लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीशी संबंधित वाद, कथित बनावट ग्रामपंचायत ठराव, नोकरीच्या अटीवर करण्यात आलेले जमीन अधिग्रहण आणि त्यानंतर शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे—या संपूर्ण प्रकरणात गडचिरोली सत्र न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण व दूरगामी परिणाम करणारा निर्णय दिला आहे. या प्रकरणात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा लागू होत नसल्याचे स्पष्ट करत सत्र न्यायालयाने दोघा आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
क्राईम क्रमांक 1308/2025 अंतर्गत आरोपी असलेले विवेक संतोष खोब्रागडे व राजकुमार हरिदास बन्सोड यांना सत्र न्यायाधीश मा. श्री. ए. एल. टिकले यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्याची जमीन कंपनीने नोकरी देण्याच्या अटीवर अधिग्रहित केली होती, त्याच शेतकऱ्याला काही दिवसांपूर्वी कंपनीने नोकरीतून काढून टाकल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून त्यामुळे शेतकरी व कामगार वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कथित बनावट ठराव आणि बेकायदेशीर करारांचे गंभीर आरोप
या प्रकरणाची पार्श्वभूमी अत्यंत गंभीर आहे. तक्रारदार धनेश जुमनाके याने लॉयड्स मेटल्स कंपनीच्या फायद्यासाठी कोनसरी ग्रामपंचायतीचा कथित बनावट व खोटा ठराव तयार केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या नावाने कंपनीसोबत करण्यात आलेले नोटरी करार चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने तयार करून ते थेट जिल्हा प्रशासनास सादर करण्यात आल्याचे आरोपही पुढे आले आहेत.
या कथित गैरप्रकारांची माहिती मिळताच संतप्त शेतकऱ्यांनी थेट गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. मोबाईलवर चित्रीकरण करत,
“खोटे कागद का तयार करण्यात आले? हे बनावट दस्तऐवज कुठून आणले?”
असे थेट प्रश्न उपस्थित करण्यात आले. मात्र या प्रकारानंतर कंपनीच्या बाजूने शेतकऱ्यांवरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
एससी–एसटी कायदा लागू नसल्याचा ठाम निष्कर्ष
या गुन्ह्यात अनुसूचित जातीतील दोन व्यक्तींसह इतर शेतकऱ्यांनाही आरोपी करण्यात आले होते. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमे तसेच एससी–एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवला होता.
मात्र न्यायालयात आरोपींच्या वतीने सादर करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्रांवरून दोन्ही आरोपी स्वतः अनुसूचित जातीचे असल्याचे स्पष्ट झाल्याने, अत्याचार प्रतिबंधक कायदा या प्रकरणात लागू होत नाही, असा ठाम निष्कर्ष सत्र न्यायालयाने काढला.
न्यायालयाने पुढे नमूद केले की, अत्याचार कायदा लागू होत नसल्यास उर्वरित आरोप हे जामीनपात्र स्वरूपाचे आहेत. तक्रारदाराच्या वतीने इतर गंभीर गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला असला, तरी एफआयआरमध्ये त्याबाबत ठोस व स्पष्ट आरोप नसल्याने त्यांचा विचार करता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
अखेर सत्र न्यायालयाने आदेश दिला की, अटक झाल्यास दोन्ही आरोपींना प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व तेवढ्याच रकमेच्या हमीसह मुक्त करण्यात यावे. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत नमूद सर्व अटींचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कंपनीच्या भूमिकेवर संशय, जिल्ह्यात तीव्र चर्चा
कंपनीविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणे आणि दुसरीकडे रोजगाराच्या आश्वासनावर दिलेली नोकरी अचानक काढून टाकणे, यामुळे लॉयड्स मेटल्स कंपनीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
या निकालामुळे कोनसरी गावातील जमीन व्यवहार, कथित बनावट ग्रामपंचायत ठराव, शेतकऱ्यांवरील गुन्हे आणि रोजगाराच्या अटी—या सर्व मुद्द्यांवर गडचिरोली जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय उदासीनतेवर गंभीर प्रश्नचिन्ह
या संपूर्ण प्रकरणात पीडित शेतकऱ्यांच्या अडचणी, अन्याय आणि गंभीर समस्या सोडविण्यासाठी आजपर्यंत एकही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यक्ती पुढे न आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतकऱ्यांची जमीन, रोजगार आणि प्रतिष्ठा धोक्यात असताना राजकीय नेतृत्वाची ही ठळक अनुपस्थिती अनेक प्रश्न निर्माण करत आहे.
विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्याही कंपनीमुळे भविष्यात शेतकरी किंवा स्थानिक नागरिक पीडित झाल्यास त्यांच्या मदतीला कोणीही धावून येणार नाही, अशी तीव्र भावना शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.
राजकीय पाठबळाअभावी शेतकरी एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले असून, कंपन्यांच्या अन्यायकारक धोरणांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना संरक्षण मिळेल का? असा सवाल उपस्थित होत आहे.
या प्रकरणाची स्वतंत्र व सखोल चौकशी होणार का, जमीन व्यवहारातील खरे दोषी कोण, आणि पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अग्रिम जामीन मंजूर झालेल्या आरोपींच्या वतीने ऍड. सोनाली मेश्राम व ऍड. मिनार खोब्रागडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.




