गडचिरोली : समाजात टीका झालीच पाहिजे. पत्रकार आणि राजकारणी हे नेहमीच टीकेचे धनी असतात. लोकशाहीत सरकारच्या चुका उघड करणे हा पत्रकारांचा मूलभूत अधिकार आहे. मात्र कोणतीही बातमी लिहिताना तिची शहानिशा करून, तथ्य तपासूनच ती मांडली पाहिजे, ही जबाबदारी पत्रकारांनी कायम लक्षात ठेवावी, असे स्पष्ट मत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. यशस्वी पत्रकारितेसाठी आपला सोर्स मजबूत ठेवा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी पत्रकार दिनानिमित्त दिला.
गडचिरोली प्रेस क्लबतर्फे आयोजित जिल्हा गौरव पुरस्कार वितरण समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. आपल्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीत सर्वात मोठा वाटा पत्रकारांचाच असल्याची जाहीर कबुली देत वडेट्टीवार म्हणाले, “माझ्याबद्दल माध्यमांनी चांगल्या बातम्यांसोबत कधी टीकात्मक बातम्याही लिहिल्या. मात्र कोणत्याही निमित्ताने मला बातम्यांमध्ये ठेवून पत्रकारांनीच मला मोठे केले.”
जिल्हा गौरव पुरस्काराने अझिझ नाथानी सन्मानित…
या समारंभात शैक्षणिक क्षेत्र, हॉटेलिंग व्यवसाय तसेच विविध सामाजिक उपक्रमांत भरीव योगदान देणारे अझिझ नाथानी यांना गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंगळवारी सायंकाळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या वेळी आ. वडेट्टीवार पुढे म्हणाले, “लेखणी शाबूत राहिली तरच लोकशाही टिकेल. मात्र आज पत्रकारांच्या व्यथा मोठ्या आहेत. अनेक ठिकाणी मालकांकडून पत्रकारांचे शोषण होत आहे, ही वस्तुस्थिती आहे.”
ते पुढे म्हणाले की, गडचिरोलीकरांमध्ये क्रीडा क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रात नाव कमावण्याची क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास हा जिल्हा नव्या उंचीवर जाईल. “कधीकाळी गडचिरोलीतून लोक बाहेर जात होते, आज मात्र बाहेरून लोक गडचिरोलीत येत आहेत,” असे सांगत त्यांनी बदलत्या गडचिरोलीकडे लक्ष वेधले.
सत्कारमूर्ती अझिझ नाथानी यांच्याबद्दल बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “मी प्रत्यक्षात विदेशात होतो. मात्र माझ्या छोट्या भावाप्रमाणे असलेल्या अझिझ नाथानी यांचा गौरव होत असल्याने हे निमंत्रण नाकारू शकलो नाही. त्यांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत अनेकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासले आहेत. त्यांचा मला अभिमान वाटतो.”
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, आमदार रामदास मसराम, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, ‘हिंदुस्तान टाइम्स’चे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष मिलिंद उमरे होते.
अरविंद सावकार पोरेड्डीवार यांनी समाजाच्या प्रगतीत प्रसारमाध्यमांचे महत्त्व विशद केले. जिल्हा गौरव पुरस्कारासाठी नेहमीच योग्य व्यक्तीची निवड केली जाते, असे सांगत त्यांनी प्रेस क्लबचे कौतुक केले. तसेच नाथानी कुटुंबीयांनी गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासात दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.
आमदार रामदास मसराम व नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी पत्रकार दिन व पत्रकारितेच्या भूमिकेवर विचार मांडले. ज्येष्ठ पत्रकार प्रदीप मैत्र यांनी पत्रकारांसमोरील आव्हाने, अडचणी आणि त्यांच्या समस्यांवर भाष्य करत नागपुरात राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद उमरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संध्या येलेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेस क्लबचे उपाध्यक्ष रुपराज वाकोडे यांनी केले. सत्कारमूर्तींचा परिचय प्रेस क्लबचे सचिव शेमदेव चाफले यांनी करून दिला. सत्काराला उत्तर देताना अझिझ नाथानी यांनी गडचिरोलीकरांचे प्रेम असेच मिळत राहो, अशी भावना व्यक्त केली.




