Home सामाजिक पुन्हा बंद पडले वाहतूक सिग्नल! इंदिरा गांधी चौकात अपघाताचे आमंत्रण; प्रशासनाच्या...

पुन्हा बंद पडले वाहतूक सिग्नल! इंदिरा गांधी चौकात अपघाताचे आमंत्रण; प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप…

0
319

 

गडचिरोली : शहरातील सर्वाधिक वर्दळीचा व अतिसंवेदनशील मानला जाणारा इंदिरा गांधी चौक येथे बसविण्यात आलेली वाहतूक सिग्नल व्यवस्था पुन्हा एकदा बंद पडली असून, त्यामुळे गडचिरोलीकरांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कुठल्यातरी कंपनीकडून ‘सप्रेम भेट’ स्वरूपात मिळालेली ही सिग्नल व्यवस्था दिवसातून दोन ते तीन वेळा बिघडत असल्याची धक्कादायक परिस्थिती सातत्याने समोर येत आहे.

सिग्नल बंद होताच वाहतूक पोलिसांची अक्षरशः तारांबळ उडत असून, चौकात वाहनचालकांची मनमानी सुरू होते. गडचिरोली शहरातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने ये-जा करत असल्याने, सिग्नल बिघडलेल्या अवस्थेत मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांच्या मते, ही परिस्थिती म्हणजे अपघातांना थेट आमंत्रण आहे.

पोलिस विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा गांधी चौकातील सिग्नल दुरुस्ती व शहरातील आणखी दोन ठिकाणी नवीन सिग्नल बसविण्याबाबत वाहतूक पोलिसांनी नगरपालिका प्रशासनाला लेखी मागणी केली आहे. मात्र, याबाबत आजपर्यंत नगरपालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.

सिग्नल बिघडल्यामुळे अनेकदा एकाच वेळी दोन बाजूंचे सिग्नल सुरू होतात, परिणामी समोरासमोरून येणाऱ्या वाहनांमध्ये भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होते. याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीती आणि संताप व्यक्त होत आहे.

जिल्हा प्रशासन, नगरपालिका प्रशासन, आरटीओ, वाहतूक पोलीस विभाग तसेच राज्य महामार्ग पोलीस विभाग यांच्या निष्क्रियतेवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, राज्य महामार्ग पोलिसांचा विभाग गेल्या दोन वर्षांपासून जवळपास निष्क्रिय अवस्थेत असून अधिकारी व कर्मचारी असूनही प्रत्यक्ष कामकाज होत नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे. “गडचिरोलीकरांचा जीव स्वस्त झाला आहे का?” असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.

वारंवार सिग्नल बिघडत असल्याने चौक परिसरात शॉर्टकट मार्गाने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे चौकाच्या मध्यभागी व चारही रस्त्यांवर बॅरिकेट्स लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तांत्रिक साधनसामग्रीचा अपुरा पुरवठा आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा यामुळे सामान्य नागरिकांना भर चौकात जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे.

दरम्यान, रविवारी शहरात साप्ताहिक बाजार भरत असल्याने चामोशी रोड, धानोरा रोड व आरमोरी रोडवरील वाहने चंद्रपूर रोडवर न सोडता तात्पुरत्या स्वरूपात बायपास मार्गाने वळवावी लागत असल्याची माहिती पोलिस विभागाने दिली आहे. वाहतूक पोलिसांची संख्या ३५ पेक्षा अधिक असतानाही शहरात कुठेही मोठा अपघात होण्याची भीती कायम आहे.

इंदिरा गांधी चौकाजवळच नागपूर व चंद्रपूरकडून येणाऱ्या एसटी बस प्रवासी उतरवण्यासाठी थांबत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बसचालकांना वारंवार सूचना देऊनही चौकातच बस थांबत असल्याने प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

शहरातील वाढती वाहतूक, पादचारी, दुचाकीस्वार आणि अवजड वाहनांची भरधाव ये-जा यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे. भर चौकातून टिप्पर, रेती तस्करीची वाहने व खनिज वाहतूक करणारी वाहने वेगाने जात असताना, त्याच वेळी सिग्नल व्यवस्था वारंवार बंद पडणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

नागरिक व विविध संघटनांनी जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सिग्नल व्यवस्था कायमस्वरूपी दुरुस्त करावी, नियमित बस थांबे निश्चित करावेत, तसेच अवजड वाहनांची आवागमन व्यवस्था नियंत्रित करावी, अशी ठाम मागणी केली आहे. यासोबतच गडचिरोली शहराबाहेर किमान पाच किलोमीटर अंतरावरून बायपास मार्ग उभारण्याचे नियोजन तातडीने सुरू करावे, अशीही मागणी पुढे येत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्यास, त्याचा विपरीत परिणाम राज्य सरकारच्या प्रतिमेवर होऊ शकतो. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने ढिसाळपणा सोडून तात्काळ प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी आता गडचिरोलीकरांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here