शहरात जल्लोष! प्रणोती यांना एबी फॉर्म; “ही केवळ उमेदवारी नाही, गडचिरोलीची प्रगती आहे” – भाजप नेते
तीन दावेदारांमधून प्रणोतींची निवड; सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय – भांगडिया
“प्रणोती नाही… ही गडचिरोलीची प्रगती!” – भाजपचा मोठा निर्णय; उच्चशिक्षित अधिवक्ता प्रणोती निंबोरकर-भांडेकर यांच्यावर विश्वास
गडचिरोली – प्रतिनिधी
गडचिरोली नगर परिषद निवडणुकीत अनेक दिवसांपासून प्रचंड उत्सुकता निर्माण करणारा नगराध्यक्ष पदाचा तिढा अखेर सोडवण्यात आला असून भाजपने उच्चशिक्षित अधिवक्त्या प्रणोती निंबोरकर-भांडेकर यांना अधिकृत एबी फॉर्म देत उमेदवारी जाहीर केली.
“प्रणोती नाही… ही गडचिरोलीची प्रगती आहे!” असे प्रतिपादन करत चिमूर-गडचिरोलीचे निरीक्षक व आमदार आ. बंटी भांगडिया यांनी त्यांच्या उमेदवारीचे जोरदार समर्थन केले होते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि सर्वसमावेशक दृष्टी असलेली उमेदवार म्हणून प्रणोती यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,रीना चिचघरे,आणि प्रणोती निंबोरकर-भांडेकर या तिघींची नावं चर्चेत होती. तिन्ही उमेदवारांनी स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत पक्षात चांगलाच तणाव निर्माण केला होता. मात्र पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर आणि सर्वेक्षण अहवालांचा अभ्यास केल्यानंतर अखेर प्रणोती यांच्या नावावर निर्णय घेण्यात आला.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आमदार बंटी भांगडिया यांनी म्हटले की “प्रणोती नाही… ही गडचिरोलीची प्रगती आहे. उच्च शिक्षित अधिवक्ता प्रणोती निंबोरकर-भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली शहराची काया पालट होणार आहे. त्यांची उमेदवारी सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी ठरेल.”त्यांच्या या विधानाने पक्षात आणि शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
शहराच्या विकासाची नवी आशा…
प्रणोती निंबोरकर हे उच्चशिक्षित,कायद्याचे उत्तम ज्ञान असलेल्या,प्रशासनाशी समन्वय साधणाऱ्या,आणि शहर विकासाच्या स्पष्ट आराखड्यासह मैदानात उतरलेल्याअशा उमेदवारांपैकी एक असल्याने नागरिकांतही त्यांच्याबद्दल उच्च अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
अंतर्गत गटबाजी असूनही अखेर सहमतीतून निघाला तोडगा…
जुन्या पदाधिकाऱ्यांचा गट आणि गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्यात उमेदवारीच्या मुद्यावर स्पष्ट मतभेद दिसत होते. नरोटे यांनी आपल्या पसंतीच्या उमेदवारासाठी मोठा आग्रह धरला होता. तरीही अखेरीस पक्षश्रेष्ठींनी भांगडिया–वाघरे यांच्या शिफारशीवर विश्वास दाखवत प्रणोती यांची निवड केली.
शहर पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात असल्याने प्रणोती निंबोरकर यांच्या निवडीमुळे राजकीय वातावरण आणखी रंगतदार होणार आहे.
गडचिरोलीचे भवितव्य कोण घडवणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




