Home ब्रेकिंग न्यूज दारूच्या नशेत घंटा गाडी चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल…गडचिरोली नगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर...

दारूच्या नशेत घंटा गाडी चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल…गडचिरोली नगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा उठले प्रश्नचिन्ह…

0
643

 

गडचिरोली :

शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तीच गडचिरोली नगर पालिका आज स्वतःच शहरवासीयांच्या असुरक्षिततेचे कारण ठरू लागली आहे. शहरातील कचरा संकलनासाठी लावलेल्या घंटा गाड्यांच्या व्यवस्थापनात असलेली गंभीर निष्काळजीपणा आणि प्रशासनातील बेजबाबदारपणा याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

 

शुक्रवारी दुपारच्या सुमारास राणी दुर्गावती शाळेसमोरील रस्त्यावर नगर पालिकेची घंटा गाडी क्रमांक १ मद्यधुंद अवस्थेत बेफाम वेगाने चालविली जात असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ चालकाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता, तो उलटपक्षी आपली गाडी लोकांच्या अंगावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. काही क्षणांसाठी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

 

नागरिकांनी मोठ्या आवाजात आरडाओरड करून चालकाला थांबविले. त्यानंतर त्या चालकाला शिवपार्वती मंगल कार्यालयाजवळ पकडण्यात आले. घटनेची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी सूरज जगताप यांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली. माहिती मिळताच वाहतूक विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व चालकाला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले.

 

प्राथमिक चौकशीत चालक संदीप सडमाके हा पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. त्याने अगोदर फुले वॉर्ड परिसरातून दारू विकत घेतली आणि त्यानंतर आपली घंटा गाडी भरधाव वेगात चालवत लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्याच्यावर नशाबंदी अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून, गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे.

 

दरम्यान, या घटनेनंतर गडचिरोली नगर पालिकेच्या निष्काळजी कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण या सर्व घंटा गाड्यांची परिवहन विभागात नोंदणी झालेली नाही. सहा महिन्यांपूर्वी वाहतूक पोलिसांनी इंदिरा गांधी चौकात चार गाड्या थांबवून नगर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना गाड्यांची नोंदणी तातडीने करण्याचे आदेश दिले होते. मात्र, आदेश मिळूनही आजपर्यंत कोणतीही गाडी नोंदणीकृत केलेली नाही.

 

नगर पालिकेने शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी करोडो रुपयांची निविदा काढली असली तरी, आजही शहराच्या प्रत्येक वॉर्डात कचरा रस्त्यांवर साचलेला दिसतो. नागरिक त्रस्त झाले असून, आता तर बिगर नंबर गाड्या आणि मद्यधुंद चालक यांच्या निष्काळजीपणामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

 

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “नगर पालिकेचा कारभार पूर्णपणे बेफिकीर पद्धतीने चालतो. कोणतीही गाडी नोंदणीकृत नाही, चालकांवर नियंत्रण नाही, आणि आता दारूच्या नशेत गाडी चालविण्यापर्यंत प्रकार गेले आहेत. प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करणे आवश्यक आहे.”

 

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नगर पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागवावे आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या अशा निष्काळजी कारभारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

 

शहरातील कचरा व्यवस्थापनाबाबत तसेच वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबाबत आधीच अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.

आता या घटनेनंतर प्रशासन जागे होते की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here