विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेंतर्गत प्रशासन थेट गावाच्या दारी; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला योजनांच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा…
धानोरा, दि. ३१ मे : शासनाच्या विशेष सर्वेक्षण व सेवा संतृप्ती मोहिमेंतर्गत धानोरा तालुक्यातील रांगी येथे आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी गावात प्रत्यक्ष भेट देऊन रात्री मुक्काम केला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश दिल्याने हा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचावा आणि कोणताही नागरिक शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, या उद्देशाने रांगी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी उपस्थिती लावली.
बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या. ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा हा प्रयत्न प्रशासनाच्या लोकाभिमुख भूमिकेचे उदाहरण असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. अनेक नागरिकांनी प्रथमच आपल्या समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या बैठकीस तहसीलदार गणेश माळी, गट विकास अधिकारी रोशन दुबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत साळवे, मंडळ अधिकारी वैशाली डोंगरे, गट शिक्षणाधिकारी हेमलता परसो यांच्यासह महसूल, कृषी, वन, शिक्षण, बँकिंग आणि ग्रामपंचायत प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी कृषी, सिंचन, महसूल, शिक्षण, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या आणि मागण्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. अनेक प्रश्नांवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
रात्रीचा मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी गावात सुरू असलेल्या विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहिमेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला. सर्वेक्षणाचे काम निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासकीय योजनांचा शंभर टक्के लाभ पोहोचविण्याच्या सूचना संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी सांगितले की, शासनाच्या विकासाभिमुख व जनकल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी प्रशासनाने कार्यालयापुरते मर्यादित न राहता गावागावात जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.
या कार्यक्रमास महसूल कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कृषी अधिकारी आर. एम. मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन तहसीलदार गणेश माळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विशेष सर्वेक्षण व संतृप्ती मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.




