Home विशेष गडचिरोलीत ‘नमो उद्यान’चा शुभारंभ; प्रभाग ११ मध्ये भव्य बगीचा व रस्त्याचे भूमिपूजन…

गडचिरोलीत ‘नमो उद्यान’चा शुभारंभ; प्रभाग ११ मध्ये भव्य बगीचा व रस्त्याचे भूमिपूजन…

0
100

शहरात विकासकामांचा गतिमान चेहरा …

गडचिरोली : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून प्रभाग क्रमांक ११ मधील सोलापूर कॉम्प्लेक्स परिसरातील फ्रेंड्स कॉलनी येथे ‘नमो उद्यान’ आणि रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन नगराध्यक्ष Advocate प्रणोती निंबोरकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. गडचिरोली शहरात प्रथमच ‘नमो उद्यान’ या नावाने आधुनिक बगीचा उभारण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, येथे भव्य व आकर्षक उद्यान उभारले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला उपाध्यक्ष निखिल चरडे, बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर, पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर, नगरसेविका साक्षी बोलूवार, नगरसेविका पुष्पलता कुमरे यांच्यासह नगरपालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष Advocate प्रणोती निंबोरकर यांनी सांगितले की, शहरातील विकासकामे ही आमची प्राथमिक जबाबदारी असून, आमच्या कार्यकाळात प्रत्येक काम गुणवत्ता राखून आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. शहरातील प्रत्येक भागात अशा प्रकारची विकासकामे राबवून गडचिरोलीला प्रगत आणि सुबक शहर बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीत पहिल्यांदाच ‘नमो उद्यान’ साकार होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. हा उपक्रम पूर्णत्वास जाऊन शहराच्या सौंदर्यात भर घालेल, तसेच नागरिकांसाठी एक दर्जेदार विरंगुळ्याचे ठिकाण ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा सभापती लीलाधर भरडकर आणि बांधकाम सभापती अनिल कुणघाडकर यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आल्यानंतर शहरात विकासकामांना मोठी चालना मिळाली आहे. आगामी काळात गडचिरोली शहराला ‘सुजलाम सुफलाम’ बनविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नगरपालिकेच्या नव्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांना प्रारंभ झाल्याने शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here