Home ब्रेकिंग न्यूज  पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारूसह महिंद्रा थार जप्त; 14.90 लाखांचा मुद्देमाल...

 पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारूसह महिंद्रा थार जप्त; 14.90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत…

0
105

 

एटापल्ली (गडचिरोली) :

जिल्ह्यात दारुबंदी लागू असतानाही अवैधरीत्या दारूची वाहतूक व विक्री करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अशा बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलिसांनी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारू आणि चारचाकी वाहन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी एटापल्ली पोलीस ठाण्याच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, एका चारचाकी वाहनातून एटापल्ली परिसरात देशी व विदेशी दारूची अवैध तस्करी केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विविध मार्गांवर सापळा रचला.

दरम्यान, संशयित वाहन क्रमांक MH 32 AS 7099 हे नारानूर–ताडपल्ली मार्गे लांझी गावाच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांनी तत्काळ वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनात मोठ्या प्रमाणात अवैध दारू आढळून आली.

पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या तपासणीत वाहनातून रॉकेट संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या 29 सीलबंद पेट्या आणि एक पेटी बिअर असा सुमारे 2 लाख 90 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

तसेच, दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली महिंद्रा थार (क्रमांक MH 32 AS 7099) ही चारचाकी गाडी, ज्याची अंदाजे किंमत 12 लाख रुपये आहे, ती देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 14 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी आरोपी मयूर विजय बालमवार (रा. वार्ड क्र. 7, गडचिरोली) याच्याविरुद्ध एटापल्ली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65(अ), 83 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 177 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कोल्हे हे करीत असून, या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा स्पष्ट इशाराही पोलिसांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here