Home ब्रेकिंग न्यूज 29 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू…

29 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू…

0
1089

 

आरमोरी (गडचिरोली) :

तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळ, आदिवासी मुलींच्या वस्तीगृहासमोरील परिसरात राहणाऱ्या 29 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी सुमारे 6 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयूर तुकाराम सोनकुसरे (वय 29, रा. आरमोरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयूर यांनी आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही बाब उघडकीस येताच नातेवाईक व शेजाऱ्यांनी तत्काळ धाव घेतली; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

मयूर यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण असून, रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मयूर स्वभावाने शांत, प्रेमळ आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी सामान्य रुग्णालय, आरमोरी येथे पाठविण्यात आला. प्राथमिक तपासात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून सर्व अंगांनी तपास सुरू आहे.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मयूर यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास आरमोरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here