गडचिरोली, दि. १ एप्रिल :
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि रेती तस्करी हप्तेखोरीच्या भरोशावर सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि दारूबंदी विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच असे आरोप होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत गंभीर शंका व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर गडचिरोली मुख्यालयाजवळील कोडगल गावातील ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
कोडगल ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावात कोणत्याही प्रकारची अवैध दारू विक्री होऊ न देण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात संबंधित सर्व प्रशासकीय विभागांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, या ठरावावर अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज कोडगल गावातील शेकडो नागरिकांनी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभाग येथे जाऊन निवेदन सादर केले. संतप्त आंदोलनकर्त्यांनी हातात फलक घेऊन “दारूबंदीची अंमलबजावणी करा”, “अवैध धंदे बंद करा” अशा घोषणांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ग्रामस्थांनी आरोप केला की, गडचिरोली जिल्ह्यात मागील ३० वर्षांपासून दारूबंदी लागू असतानाही अनेक ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. काही भागात तर बियर बारसारखी व्यवस्था करून विक्री होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. तरीदेखील संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, कालच्या पत्रकार परिषदेत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना स्पष्ट केले की, हा संपूर्ण प्रकार ते राज्याच्या सर्वोच्च पातळीवर मांडणार आहेत. त्यांनी सांगितले की, ते हा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असून, रेती तस्करीसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही लक्षात ही बाब आणून देणार आहेत.
तसेच, मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरू राहू दिले जाणार नाहीत, याची दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. ग्रामस्थांच्या अडचणींना प्राधान्य देत त्यांच्या प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, तसेच कोडगल गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची ठाम भूमिका आमदारांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अवैध दारू विक्री आणि रेती तस्करीवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून, याकडे दुर्लक्ष झाल्यास पुढील काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशाराही दिला आहे. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था आणि दारूबंदी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.




