Home ब्रेकिंग न्यूज अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ; चामोर्शी–मुल मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, मोठा अनर्थ टळला…

अवैध रेती वाहतुकीचा धुमाकूळ; चामोर्शी–मुल मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, मोठा अनर्थ टळला…

0
273

 

चामोर्शी | प्रतिनिधी :

चामोर्शी–मुल मुख्य मार्गावर अवैध रेती वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आज पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. २५ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे १०:०० वाजताच्या सुमारास चामोर्शी शहराजवळील सोनालीका शोरूम परिसरात रेतीने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अचानक उलटली. ट्रॉलीचे पट्टे तुटल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या ट्रॉलीमध्ये मोठ्या प्रमाणात रेती भरलेली असल्याने ती थेट रस्त्यावर कोसळली आणि काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा अपघात मोठ्या दुर्घटनेत परिवर्तित होऊ शकला असता, अशी चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये रंगली आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक अधिकाधिक फेऱ्या मारण्याच्या नादात नियमांची सर्रास पायमल्ली करत आहेत. भरधाव वेग, ओव्हरलोडिंग आणि बेफिकीर वाहनचालक यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, चामोर्शी तालुक्यात अवैध रेती उपसा आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर येत आहे. मोहुर्ली घाट, वाघोली घाट, बोरघाट घाट, बोरी घाट तसेच अनखोडा–कळोली घाट परिसरात जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात असून, दिवस-रात्र ट्रॅक्टरद्वारे तिची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

या अवैध प्रकारामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असून पर्यावरणालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. नद्यांच्या पात्रांमध्ये अनियंत्रित उत्खननामुळे भूगर्भीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित प्रशासन आणि महसूल विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून अवैध रेती उपसा आणि वाहतूक तात्काळ थांबवावी, तसेच संबंधित रेती माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस सोशल मीडिया प्रमुख विजय लाड यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here