गडचिरोली : हिंदू नववर्षाच्या शुभमुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभागाला मोठे यश मिळाले आहे. एकीकडे जिल्ह्यातील बंगाली येथे ११वे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्यात आले, तर दुसरीकडे विविध कॅडरमधील ११ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करून हिंसेचा मार्ग सोडत समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ६ महिला व ५ पुरुषांचा समावेश असून, या सर्वांवर मिळून एकूण ६८ लाख रुपयांचे बक्षीस शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. आत्मसमर्पणानंतर या सर्वांना शासनाच्या नियमानुसार पुनर्वसन, आर्थिक मदत तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत आत्मसमर्पण केलेल्या सर्व नक्षलवाद्यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते भारतीय संविधानाच्या प्रती देण्यात आल्या. हिंसेचा मार्ग सोडून शांततामय जीवन स्वीकारण्याचा संदेश देत त्यांना नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
दरम्यान, शासनाने ३१ मार्चपर्यंत नक्षल निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले असल्याच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कडक इशारा दिला. “३१ मार्चपूर्वी उर्वरित सर्व नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे. अन्यथा उरलेले नक्षलवादी आमच्या गोळीच्या निशाण्यावर असून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पोलीस अधीक्षकांनी पुढे सांगितले की, गडचिरोली जिल्ह्यात सध्या सुमारे सहा नक्षलवादी शिल्लक असल्याचा अंदाज असून, त्यापैकी एक गडचिरोलीतील तर कंपनी क्रमांक १० मधील पाच नक्षलवादी हे छत्तीसगड राज्यातील आहेत. या नक्षलवाद्यांचे वास्तव्य अबूजमाडच्या घनदाट जंगल परिसरात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आज झालेल्या आत्मसमर्पण कार्यक्रमाला विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे कमांडंट अधिकारी अजय कुमार शर्मा, तसेच पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गुढीपाडव्याच्या शुभदिनी झालेल्या या घडामोडींमुळे गडचिरोली जिल्ह्यात शांतता आणि विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेल्याचे मानले जात आहे. तसेच उर्वरित नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून शासनाच्या पुनर्वसन योजनेचा लाभ घ्यावा आणि मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन यावेळी पोलीस विभागाकडून करण्यात आले.




