गडचिरोली :
गडचिरोली– मार्गावरून आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या एका भरधाव अवजड टिप्पर ट्रकने C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना पोर्ला किटाळी गावाजवळ घडली. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने वाहनातील 10 जवानांचा जीव थोडक्यात बचावला असून मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली ते धानोरा मार्गावरील सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या ठिकाणी गिट्टी खाली करून संबंधित टिप्पर वाहन पाचगाव (नागपूर)कडे परत जात होते. दरम्यान अचानक समोर आलेल्या दुचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने टिप्पर उजव्या बाजूला वळवला. त्याच वेळी समोरून येत असलेल्या C-60 पथकाच्या बुलेटप्रूफ वाहनाला त्याची जोरदार धडक बसली.
धडक देणाऱ्या टिप्पर वाहनाचा वेग अत्यंत जास्त असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. टिप्परने बुलेटप्रूफ वाहनाच्या मागील बाजूला, चालकाच्या बाजूच्या मागच्या चाकाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे बुलेटप्रूफ वाहनाचा टायर पूर्णपणे खराब झाला असून टायरचा लोखंडी डिस्कसुद्धा वाकून गेल्याचे दिसून आले. धडकेची तीव्रता इतकी होती की टिप्पर वाहनाच्या समोरील टायरचे दोन नट-बोल्टही जागेवरून निघून गेल्याचेही समोर आले आहे.
या धडकेमुळे C-60 वाहनाचा मागील टायर फुटल्याने वाहन काही क्षण अनियंत्रित झाले आणि पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेताच्या खालच्या भागात उतरले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे आणि वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे सर्व जवान सुरक्षित बचावले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी C-60 पथकातील जवान दिवस-रात्र जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असतात. मात्र अलीकडील काळात जिल्ह्यातील रस्त्यांवर अवजड वाहनांची वाढलेली वर्दळ, वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहतूक व्यवस्थेतील अनियमितता यामुळे जवानांसह सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात खनिज, लोखंड, लाकूड तसेच इतर मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर टिप्पर आणि ट्रकची वाहतूक सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असून वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे अपघातांची शक्यता वाढत आहे. परिणामी नागरिकांसह पोलीस आणि सुरक्षा दलांनाही प्रवास करताना जीव धोक्यात घालावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेकडे प्रशासन, वाहतूक पोलीस आणि परिवहन विभाग दुर्लक्ष करत आहेत का, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गडचिरोली शहरातून जाणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर अवजड वाहनांची अनियंत्रित वाहतूक सुरू असल्याने गंभीर अपघातांचा धोका वाढत चालल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
आजच्या घटनेत C-60 जवानांचे वाहन बुलेटप्रूफ असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र जर हेच जवान एखाद्या सामान्य वाहनात प्रवास करत असते, तर या अपघातात मोठी दुर्घटना घडली असती, अशीही चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे, वेगमर्यादेचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे तसेच संवेदनशील मार्गांवर विशेष वाहतूक नियम लागू करावेत, अशी मागणी गडचिरोलीकरांकडून जोर धरू लागली आहे.




