Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोलीत अपघातांची मालिका कायम : अवैध रेतीघाटावर मजुराचा मृत्यू, भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून...

गडचिरोलीत अपघातांची मालिका कायम : अवैध रेतीघाटावर मजुराचा मृत्यू, भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न असल्याची माहिती…

0
2340

 

गडचिरोली :

गडचिरोली जिल्ह्यात तसेच जिल्हा मुख्यालयाच्या परिसरात अपघातांचे सत्र थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसून येत नाहीत. बिघडलेले नियोजन, प्रशासनाची ढिसाळ अंमलबजावणी आणि अवैध रेती तस्करीमुळे निष्पापांचा जीव जात असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच गडचिरोली तालुक्यातील एका  रेतीघाटावर घडलेली भीषण घटना संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणारी ठरली आहे.

आज सकाळी नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान, एका रेतीघाटावर ट्रॅक्टर वाहन मागे घेत असताना रेती ढुलाईचे काम करणाऱ्या एका मजूर युवकाला जोरदार धडक बसली. या अपघातात संबंधित युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाचे नाव ईश्वर धर्माजी कुरुटकर (वय २७ वर्षे) असे असून तो रेतीघाटावर मजुरीचे काम करत होता.

पोलिसांना अंधारात ठेवून मृतदेह रुग्णालयात सोडला…

अपघातानंतर आणखी धक्कादायक बाब समोर आली असून, घटनेची माहिती पोलिसांना न देता संबंधित रेतीघाट चालवणाऱ्या लोकांनी मृतदेह थेट रुग्णालयात आणून सोडल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकारातून प्रकरण दाबण्याचा आणि दोषींना वाचवण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट होत आहे.

भाजपच्या मोठ्या नेत्यांचा हस्तक्षेप?

या प्रकरणात भाजपच्या काही मोठ्या नेत्यांकडून दबाव आणून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासनावर दबाव टाकला जात असून, पैशाच्या जोरावर पीडित कुटुंबीयांना समजूत काढून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे सावट अधिक गडद झाले आहे.

अवैध रेती तस्करांची वाढलेली मुजोरी…

अवैधपणे सुरू असलेल्या रेती तस्करीमुळे कामावर असलेल्या मजुराच्याच मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप होत आहे. रेतीघाटावर राजकीय आश्रय असल्याने संबंधित तस्कर निर्भयपणे वावरत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

तहसीलदारांची प्रतिक्रिया…

या संदर्भात गडचिरोली तालुक्याचे तहसीलदार सागर कांबळे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, “संबंधित रेतीघाटावर दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. आमचे कर्मचारी घटनास्थळी तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. अवैध रेती विक्रीबाबत सविस्तर माहिती घेऊन नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.”

प्रशासनाची भूमिका काय?

एका तरुण मजुराचा जीव गेल्यानंतरही राजकीय दबावाखाली प्रकरण दाबले जात असेल, तर हा केवळ अपघात नसून गंभीर प्रशासकीय अपयश आहे. आता या प्रकरणात खरोखर दोषींवर कारवाई होणार की पुन्हा एकदा राजकीय दबावामुळे प्रकरण दाबले जाणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here