3 तासांपर्यंत मृतदेहाची अग्निपरीक्षा च केली आरोग्य विभागाने…
गडचिरोली | प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री स्वतः ज्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करत आहेत, त्या गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात अत्यंत लाजिरवाणा व अमानवी प्रकार समोर आला आहे. अपघात तसेच संशयित मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या पोस्टमार्टमसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य थेट मृतांच्या कुटुंबीयांकडूनच बाहेरून आणायला लावले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
संतोष गोमस्कर यांच्या शवविच्छेदनावेळी प्रकार उघड…
काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चांदवड रोडवर झालेल्या भीषण अपघातात संतोष हिरामण गोमस्कर यांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर त्यांचा मृतदेह गडचिरोली सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याच वेळी पोस्टमार्टमसाठी लागणारे साहित्य रुग्णालयाकडून उपलब्ध न करून देता, ते साहित्य मृताच्या नातेवाईकांनाच बाहेरून आणायला लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार प्रत्यक्ष पाहायला मिळाला.
दुःखाच्या प्रसंगी आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या कुटुंबीयांना प्रशासनाकडून मदत मिळण्याऐवजी अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचा संतप्त आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे सामान्य रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेची भीषण वास्तवता पुन्हा एकदा उघड झाली आहे.
हजारो कोटींचा निधी असूनही आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था…
गडचिरोली जिल्ह्याला विविध विकास योजनांअंतर्गत हजारो कोटी रुपयांचा निधी मिळत असताना, आरोग्य विभागाची ही अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात मृतदेहाच्या पोस्टमार्टमसाठी आवश्यक मूलभूत साहित्यही उपलब्ध नसेल, तर निधी नेमका कुठे खर्च केला जातो, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अपघात प्रकरणांवरही संशयाचे सावट…
मागील काही दिवसांत रस्ता बांधकाम करणाऱ्या कंपन्यांच्या वाहनांमुळे घडलेल्या अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले आहेत. काही प्रकरणांत धनाढ्य कंपन्यांच्या दबावामुळे आणि पोलिस प्रशासनाच्या कथित मदतीने अपघातास कारणीभूत वाहने घटनास्थळावरून हटवण्यात आल्याचे गंभीर आरोप पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहेत.
तात्काळ कारवाई व चौकशीची मागणी…
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण आरोग्य विभागाच्या खरेदी-विक्री व्यवहारांची, निधी वापराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी ठाम मागणी संतप्त नागरिक व पीडित कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे.
दुःखाच्या वेळी मदतीसाठी असलेली शासकीय यंत्रणाच जर नागरिकांना अधिक वेदना देत असेल, तर ही यंत्रणा नेमकी कुणासाठी आहे, असा सवाल आता गडचिरोलीकर नागरिक उपस्थित करत आहेत.




