Home ब्रेकिंग न्यूज मूर्ती लहान, कीर्ती महान!…; सर्वात युवा नगरसेवक निखिल चरडे उपाध्यक्षपदी विराजमान.

मूर्ती लहान, कीर्ती महान!…; सर्वात युवा नगरसेवक निखिल चरडे उपाध्यक्षपदी विराजमान.

0
756

 

गडचिरोली :

गडचिरोली नगरपालिकेच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने १५ नगरसेवक निवडून आणत नगराध्यक्षपदावर आपला उमेदवार निवडून आणला. निसटता विजय मिळवला असला, तरी त्यानंतर सभापतीपद, उपाध्यक्षपद आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीत भाजपने सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी खेळी खेळली आहे.

नगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच सर्वात कमी वयाचे युवा नगरसेवक निखिल चरडे यांची थेट उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “मूर्ती लहान पण कीर्ती महान” या म्हणीचा प्रत्यय या निर्णयातून आला आहे.

निखिल चरडे हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले युवा नेतृत्व असून त्यांच्या नावाला कोणत्याही पक्षाचा ठोस विरोध नसल्याचे चित्र यावेळी स्पष्टपणे दिसून आले. २७ नगरसेवकांपैकी सर्वात युवा असलेले निखिल चरडे उपाध्यक्षपदी विराजमान झाल्याने गडचिरोलीच्या राजकीय वर्तुळात नव्या पिढीच्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, भाजपच्या वतीने स्वीकृत सदस्यपदी सागर अरुण निंबोरकर आणि माजी नगरसेवक सुधाकर येनगंधलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एका स्वीकृत सदस्यपदावर काँग्रेसचे माजी नगरसेवक नंदू कायरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या स्वीकृत सदस्यांसह आता १७ वर पोहोचली आहे.

नूतन नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या उपस्थितीत आज उपाध्यक्षपदावर निखिल चरडे यांची अधिकृत घोषणा होणार असून, उर्वरित तीन स्वीकृत सदस्यांचीही नावे जाहीर केली गेली आहेत. उपाध्यक्षपदासाठी आणि स्वीकृत सदस्यांसाठी अनेक ज्येष्ठ व प्रस्थापित राजकीय नेत्यांची नावे चर्चेत असताना, सर्वात कमी वयाच्या निखिल चरडे यांना संधी देत भाजपने “जोर का झटका, धीरे से” अशी राजकीय खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

आता येणाऱ्या काळात गडचिरोली शहरातील गटार, नाली बांधकाम, स्वच्छता-सफाई, तसेच मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या वस्त्यांमध्ये रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व नागरी सुविधा पोहोचवण्याचे मोठे आव्हान नवनियुक्त पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे. भाजपच्या नव्या नेतृत्वाकडून शहर विकासासाठी कोणती कार्यप्रणाली राबवली जाते, याकडे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here