गडचिरोली : मुलचेरा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत एका कंत्राटी आरोग्य सेविकेचे वेतन वाढवून देण्याचे आमिष दाखवत वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने शारीरिक सुखाची मागणी केल्याच्या धक्कादायक प्रकरणावर शिवसेनेने कडक भूमिका घेतली आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा नेत्या छायाताई कुंभारे यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याला तात्काळ बडतर्फ करून जिल्ह्याबाहेर हाकलण्याची मागणी केली.
माहितीनुसार, आरोपी वैद्यकीय अधिकारी पीडित सेविकेला वेतनवाढ देण्याचे आश्वासन देत दीर्घकाळ मानसिक व शारीरिक त्रास देत होता. अखेर हा छळ असह्य झाल्याने आरोग्य सेविकेने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
छायाताई कुंभारे यांनी संताप व्यक्त करत सांगितले की “ही घटना जिल्ह्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोक्याची घंटा आहे. अशा व्यभिचारी अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून जिल्ह्याबाहेर हुसकावून लावले पाहिजे. अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल.”
त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत म्हटले की,“महिला आरोग्य सेविका सुरक्षित नाहीत, तर आरोग्य व्यवस्था कशी सुरळीत चालणार? दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.”
निवेदन देताना छायाताई कुंभारे, ज्योत्सनाताई राजूरकर, आरतीताई खोब्रागडे, शिवसेना गडचिरोली तालुकाप्रमुख नवनाथ उके, स्मिता उके आणि मिता परीकर उपस्थित होते.
शिवसेनेने या प्रकरणाचा तपास गतीमान करण्याची व आरोपीवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




