मोबाईलवरील संशयास्पद संदेशांचे स्क्रीनशॉटही पीडितेकडून दाखविले**
गडचिरोली : भवानीपुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी परिचारिकेने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून ६ डिसेंबर रोजी सायंकाळी तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणामुळे संपूर्ण आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
धमकी देत शारीरिक सुखाची मागणी?
२१ वर्षांपासून आरोग्य विभागात सेवा देत असलेल्या या परिचारिकेवर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री (वय ४८) यांनी पगारवाढीसाठी शिफारस करणार नाही अशा धमक्या देत शारीरिक शोषणाचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तिच्या मुलीच्या शिक्षणासाठी ‘बी-फॉर्म’ प्रक्रिया सुरू असताना आर्थिक अडचणी अधिक गडद झाल्या होत्या. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी अधिकाऱ्याने वारंवार अनुचित मागण्या केल्याचे समोर आले आहे.
मोबाईलवरील आरोपीचे संदेशही दाखविले…
पीडित महिला एवढ्यावरच थांबली नाही. चौकशीदरम्यान तिने आरोपीच्या मोबाईलवरून आलेल्या संशयास्पद आणि अनुचित संदेशांचे स्क्रीनशॉटही अधिकाऱ्यांना दाखविले आहेत. हे स्क्रीनशॉट प्रकरणातील पुरावे म्हणून महत्त्वाचे ठरणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आत्महत्येचा प्रयत्न — ‘सायक्लोन’ तणनाशक प्राशन…
सततच्या छळामुळे मानसिक दडपणाखाली आलेल्या परिचारिकेने राहत्या घरी ‘सायक्लोन’ नावाचे तणनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने उपचारासाठी हलवल्यानंतर तिची प्रकृती आता धोक्याबाहेर असल्याची माहिती सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे.
पोलिस आणि प्रशासनाची कारवाई सुरू…
घटनेची माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी तसेच तहसीलदारांनी पीडित महिलेचा बयान नोंदविला आहे. बयानातील तपशीलावरून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
पाच सदस्यीय चौकशी समिती नेमली…
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत ५ सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली असून, यामध्ये दोन महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
ही समिती पीडितेचे आणि इतर कर्मचाऱ्यांचे बयान,रुग्णालयातील वातावरण,स्क्रीनशॉटसह सर्व पुरावे,यांची तपासणी करून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठांना करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले।
या प्रकारामुळे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अधिकारी दबाव आणत असल्याच्या घटना आधीही घडल्या असून, या प्रकरणाने प्रश्न अधिक तीव्र केला आहे.




