गडचिरोली ::
शहरातील अल्पवयीन मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या तंबाखूविक्रेत्यांवर अखेर पोलिसांचा ससा लागला आहे. अल्पवयीनांना तंबाखूजन्य पदार्थ खर्रा विक्री करणाऱ्या चार पानठेले चालकांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांच्याकडील साहित्य जप्त केले आहे. या कारवाईनंतर शहरातील पानठेल्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, ‘मिडिया’ने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधल्यानंतर केवळ काही तासांतच पोलिसांनी ही कारवाई केली. मात्र, शहरभर सुरू असलेल्या सुगंधीत तंबाखू विक्रीबाबत अन्न प्रशासन विभागाने अजूनही एकाही विक्रेत्यावर कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या विक्रेत्यांना कोणाचे संरक्षण मिळते आहे, असा प्रश्न जनतेतून उपस्थित होत आहे.
अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांना विचारले असता त्यांनी कोणतेही उत्तर न देणे पसंत केले. त्यामुळे “या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरले आहे का?” असा संशय अधिकच बळावला आहे. दररोज शेकडो युवक आणि शालेय विद्यार्थी या घातक पदार्थांच्या विळख्यात अडकत असून, त्यांच्या आरोग्याशी चाललेला हा खेळ अत्यंत चिंताजनक ठरत आहे.
गडचिरोली पोलिसांनी इंदिरा गांधी चौक परिसरातील चार पानठेल्यांवर धाड टाकून खर्रा बनविण्याचे साहित्य जप्त केले. या कारवाईत —
सुनील केशव बावनवाडे (रा. गोकुलनगर),
मंगेश देवराव कन्नाके (रा. हनुमान वॉर्ड),
संजय केशवराव केवटकर (रा. रामपुरी वॉर्ड),
राजू उष्टू भोयर (रा. माळी मोहल्ला)
या चार पानठेले चालकांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हे विक्रेते १८ वर्षांखालील मुलांना खर्रा विक्री करताना रंगेहात पकडले गेले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय मुसनवार आणि हवालदार श्यामराव अंकल यांनी केली.
नागरिकांचा प्रश्न असा आहे की, अल्पवयीन मुलांच्या आरोग्याशी संबंधित या विषयावर पोलिसांनी तर तातडीने कारवाई केली, परंतु अन्न प्रशासन विभाग मात्र गप्प का? प्रशासनातील निष्क्रिय अधिकाऱ्यांवर जिल्हा प्रशासन आता जबाबदारी निश्चित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




