Home विशेष नगर पालिकेच्या निवडणुकीत दमदार उमेदवार निवडण्यासाठी राजकीय पक्षांची दमछाक…

नगर पालिकेच्या निवडणुकीत दमदार उमेदवार निवडण्यासाठी राजकीय पक्षांची दमछाक…

0
382

 

 

गडचिरोली:गडचिरोली नगरपरिषदेचे आरक्षण जाहीर होताच, शहराच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. यंदा नगराध्यक्षपद ‘साधारण प्रवर्गातील महिला’साठी आरक्षित झाल्याने, या पदावर कोणाची लॉटरी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात पारंपारिकरित्या कॉंग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होत असतो. यंदाही हेच चित्र दिसण्याची चिन्हे आहेत.

 

भाजप व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांत आतापासूनच उमेदवारीसाठी पाठीमागून हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपात उमेदवारांची अक्षरशः गर्दी दिसत आहे. पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते इंजी.प्रमोद पिपरे यांनी आपल्या पत्नी व माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. लोकांच्या मनात रुजलेल्या चेहऱ्यांना संधी मिळाल्यास, आपल्या पत्नीला पुन्हा रिंगणात उतरवण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.

 

काही माजी सभापती सुद्धा आपल्या पत्नींना नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा जोरात सुरू झालेली आहे.

माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे या पुन्हा पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. माजी महिला जिल्हाध्यक्ष गीता हिंगे , काही माजी नगरसेविका, शहरातील एक मोठा राष्ट्रवादी नेता सुद्धा आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात व्यस्त असल्याचे म्हटले जात आहे. शहरातील एक पत्रकाराच्या आणि प्रसिद्ध वकिलाच्या पत्नीचे नाव सुध्दा चर्चेत आहेत.

 

दरम्यान, भाजपाकडून गीता हिंगे यांचे नाव सध्या जोरात चर्चेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर वाढलेल्या आणि अनेक सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या गीता हिंगे या गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या शिक्षण, संघटन कौशल्य व स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. तथापि, ओबीसी मधील कमी संख्येत असलेल्या समाज घटकातील असल्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

 

हल्लीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी भाजप वर 5 कोटी रुपये खर्च करून पाडण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका केल्यामुळे नगर पालिकेच्या निवडणुकीत महायुती तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादी अजित पवार,शिंदे सेना,आणि शहर विकास आघाडी असे एक गट निर्माण करून काही नगरसेवक आणि नगराध्यक्षांची नाव निश्चित करण्यात आली असल्याची बाब उघडकीस येत आहे.

दुसरीकडे, कॉंग्रेसमध्ये मात्र इच्छुकांची फारशी गर्दी दिसून येत नाही. मात्र, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अँड.कविता मोहरकर या नावाने चर्चेला जोर धरला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्या सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून, दोनशेहून अधिक बचत गटांची निर्मिती करून त्यांनी दोन हजारांहून अधिक घरांपर्यंत थेट पोहोच साधली आहे. ग्रासरूटवर त्यांचा मजबूत प्रभाव असल्याने, त्या कॉंग्रेसकडून प्रभावी उमेदवार ठरू शकतात.

 

अँड.कविता मोहरकर या महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष असून, त्या ओबीसी समाजात त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा प्रभावी ठसा उमटवला आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदावर त्यांचा ‘नैसर्गिक हक्क’ असल्याची चर्चा पक्षात सुरू आहे. “संधी मिळाल्यास, आम्ही ती संधीचे सोने करू,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आम आदमी पार्टीदेखील या निवडणुकीत आपली एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यंदाची नगरपरिषद निवडणूक चुरशीची होणार हे नक्की झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here