Home ब्रेकिंग न्यूज फोकुर्डीत भीषण आगीचा कहर; शेतकऱ्याचे १०० पोते धान्य जळून खाक, लाखोंचे नुकसान…

फोकुर्डीत भीषण आगीचा कहर; शेतकऱ्याचे १०० पोते धान्य जळून खाक, लाखोंचे नुकसान…

0
95

 

चामोर्शी, दि. ७ जून :

चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी गावात रविवारी दुपारी भीषण आग लागून एका शेतकऱ्याचे धान व मक्का साठवून ठेवलेली झोपडी जळून खाक झाली. या दुर्घटनेत शेतकरी दत्तूजी बाबुराव झाडे (वय ५७) यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लाखो रुपयांचा शेतमाल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नुकसानग्रस्त कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे ४ वाजताच्या सुमारास झाडे यांच्या शेतातील झोपडीला अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. झोपडीत साठवून ठेवलेले ४५ पोते मक्का आणि ५५ पोते धान आगीत पूर्णपणे जळून खाक झाले. शेतमालासह झोपडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाणी, माती आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. गावकऱ्यांच्या तत्परतेमुळे आग शेजारील शेतांपर्यंत आणि इतर मालमत्तेपर्यंत पसरण्यापासून रोखण्यात यश आले. अन्यथा आणखी मोठी हानी होण्याची शक्यता होती.

 

दरम्यान, अग्निशमन दलालाही घटनेची माहिती देण्यात आली होती. मात्र माहिती उशिरा मिळाल्याने अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी बहुतांश आग आटोक्यात आणली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी झाडे यांचे धान्य व झोपडी वाचवता आली नाही.

 

या घटनेची माहिती फोकुर्डी गावचे उपसरपंच तुमदेव दहेलकर यांनी संबंधित महसूल प्रशासनाला दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत मिळावी यासाठी पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर संबंधित तलाठी यांनी रविवारची शासकीय सुटी असल्यामुळे सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

 

या आगीत नेमके किती आर्थिक नुकसान झाले याचा अधिकृत आकडा पंचनाम्यानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचा शेतमाल जळाल्याने झाडे कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेतीमालाचे वाढते उत्पादन खर्च, अनिश्चित हवामान, नैसर्गिक संकटे आणि बाजारात मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत असताना या आगीने त्यांचे कंबरडे मोडले आहे.

 

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, तसेच आपत्ती निवारण निधीतून योग्य नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीने उभा केलेला हंगाम काही क्षणांत राख झाल्याने संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here