Home भ्रष्टाचार तीन वर्षांपासून रखडलेल्या फोकुर्डी–मुरखडा चक मार्गावर संतापाचा उद्रेक; चौकशी करून दोषींवर कारवाईची...

तीन वर्षांपासून रखडलेल्या फोकुर्डी–मुरखडा चक मार्गावर संतापाचा उद्रेक; चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी…

0
167

 

 

अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात; संबंधित अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी…

 

चामोर्शी, दि. ८ जून : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत (PMGSY) सुमारे तीन वर्षांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेल्या फोकुर्डी–मुरखडा (माल)–मुरखडा चक मार्गाच्या बांधकामाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून उभारण्यात येणारा हा रस्ता तीन वर्षांनंतरही पूर्णत्वास न गेल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड यांनी केली आहे.

 

विजय लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील अनेक नाले व पुलांचे बांधकाम करण्यात आले असले तरी त्या ठिकाणी आवश्यक असलेली साईड भराई करण्यात आलेली नाही. त्यामुळे रस्ता आणि नाल्यांची उंची वाढली असून दोन्ही बाजूंना दीड ते दोन फूट खोल खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरू शकतात.

 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका कायम निर्माण झाला आहे. अनेक दुचाकीस्वार किरकोळ तसेच गंभीर अपघातांचे बळी ठरल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पहिल्या थरानंतरच थांबले डांबरीकरण…

 

या रस्त्याचे डांबरीकरण केवळ पहिल्या थरापर्यंतच करण्यात आले असून त्यानंतर काम अचानक बंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी रस्त्यावर सर्वत्र खडी उखडून पडली असून प्रवास धोकादायक बनला आहे. रस्त्यावर विखुरलेल्या गिट्टीमुळे दुचाकी घसरण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. काही ठिकाणी तर उखडून पडलेली गिट्टी नागरिक घरबांधणीसाठी उचलून नेत असल्याचेही दिसून येत आहे, यावरून कामाची दयनीय अवस्था स्पष्ट होत आहे.

 

सार्वजनिक निधीचा अपव्यय की प्रशासनाची निष्क्रियता?

 

तीन वर्षांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण न होणे हे अत्यंत गंभीर व संशयास्पद असल्याचे विजय लाड यांनी म्हटले आहे. अपूर्ण कामाचे बिल संबंधित कंत्राटदाराने काढले आहे का? कामाची गुणवत्ता तपासण्यात आली होती का? या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी जबाबदार अधिकारी कोण आहेत? यासारखे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

 

शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणारा रस्ता रखडल्याने सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन नेमके कोणाच्या हिताचे रक्षण करत आहे, असा सवालही स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित कंत्राटदारावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय लाड यांनी केली आहे. तसेच रखडलेले काम तातडीने पूर्ण करून रस्त्याची गुणवत्ता तज्ज्ञांकडून तपासण्यात यावी आणि नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व टिकाऊ रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा…

 

या प्रश्नावर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा विजय लाड यांनी दिला आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या निष्काळजीपणाविरोधात रस्त्यावर उतरून लढा उभारला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

“तीन वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक निधी खर्च होऊनही काम अपूर्ण राहणे ही गंभीर बाब असून दोषींना पाठीशी घालण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” असे विजय लाड यांनी ठामपणे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here